फुलंब्रीतील सरस्वती विद्यालयातील क्रीडा शिक्षक डी. डी. नाचन यांचा गौरव

Foto
फुलंब्री (प्रतिनिधी) : सरस्वती विद्यालयाचे क्रीडा शिक्षक डी. डी. नाचन यांनी ३० वर्षांच्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांचे फळ आज विविध स्तरांवरील यशातून दिसून येत आहे.

 त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय, तर चार विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. याबाबत डी.डी. नाचन यांचा सत्कार केला.

याचबरोबर एका विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत कांस्यपदक पटकावून शाळा, पालक व जिल्ह्याचे नाव देशभरात उज्वल केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे नाचन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण मेहनत व समर्पण असल्याची भावना व्यक्त होत आहे. 

या उल्लेखनीय कार्याबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष श्री. कैलास पाटील गव्हाड व कोषाध्यक्ष श्री. जगन्नाथ गव्हाड यांनी नाचन सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नाचन सर यांच्या कार्याचे तळेगाव परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीयस्तरावर यशाची नवी शिखरे गाठतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.